
स्वच्छ व हरित विद्यालय स्पर्धेत साताऱ्याचा राष्ट्रीय स्तरावर ठसा
पाटणच्या तीन शाळांची देशपातळीवर निवड
सातारा : केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित ‘स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग २०२५-२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. पाटण तालुक्यातील तीन शाळांनी देशपातळीवर मानांकन मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्रातून निवड झालेल्या आठ शाळांपैकी तब्बल तीन शाळा सातारा जिल्ह्यातील आहेत. यात शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे आणि पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, पाटण या शाळांचा समावेश आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, शाश्वत विकास ध्येये (SDGs) आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या निकषांवर शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पाटण तालुक्यातील शाळांनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला.
या यशामागे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी शाळांना नियमित भेटी देऊन मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. सतीश फरांदे आणि शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी कानवटे यांनी शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सभापती ऋतुजा शिंदे, लता कर्णे, ऋषिकेश धायगुडे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्यासह विविध मान्यवरांनी संबंधित शाळांचे आणि शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.


