
सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर; महाबळेश्वरात पूल कोसळला
चार वाहने वाहून गेली, पश्चिम भागात मोठे नुकसान
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून विशेषतः महाबळेश्वर, जावळी, परळी खोरे, खंडाळा आणि सातारा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूल कोसळणे, दरडी कोसळणे, शाळांच्या इमारतींचे नुकसान, घरांची पडझड, वीजपुरवठा खंडित होणे आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ अशा घटनांमुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
महाबळेश्वरमधील वेण्णा लेकजवळ मुख्य रस्त्याला जोडणारा छोटा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यावरील चार वाहने पाण्यात वाहून गेली. प्रशासनाने तातडीने क्रेनच्या सहाय्याने ही वाहने बाहेर काढली. तर मेढा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा खडक परिसरात दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड-माती साचली आणि काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली.
आंबेघर पुलाचा भराव खचल्यामुळे मेढा–महाबळेश्वर मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेतली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
परळी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे अनेक शाळांच्या इमारतींना तडे गेले असून कारी येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून विहिरी खचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कुस खुर्द, पांगारे आणि खडगाव येथे घरांची पडझड, पत्रे उडणे आणि भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
खंडाळा तालुक्यातील मिरजे येथे प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत लगतच्या महादेव सोनावणे यांच्या गोठ्यावर कोसळल्याने एक शेळी व एक करडू दगावले. तर भादे येथील बाळासाहेब साळुंखे यांच्या घराची भिंतही कोसळली. मोरेवाडी गावात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला.
दरम्यान, जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून वाई येथे कृष्णा नदीचा प्रवाह वाढला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा सुमारे २९ टक्क्यांवर पोहोचला असून बहुतांश धरणांमध्येही जलसाठ्यात वाढ होत आहे.
महाबळेश्वरमध्ये २४ तासांत २०.१९ इंच पावसाची नोंद
महाबळेश्वर आणि परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल ५१३ मि.मी. (२०.१९ इंच) पावसाची विक्रमी नोंद झाली. यंदाच्या हंगामात आतापर्यंत १,७१७.४० मि.मी. (६७.६१ इंच) पाऊस झाला आहे.
सोमवारी जिल्ह्यात सरासरी ५२.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सातारा ३९.२ मि.मी., जावळी १५३.५ मि.मी., पाटण ४७.२ मि.मी., कराड २५.७ मि.मी., कोरेगाव ४७.१ मि.मी., खटाव १९.४ मि.मी., माण ५ मि.मी., फलटण १८.८ मि.मी., खंडाळा ६२.४ मि.मी., वाई ८८.४ मि.मी., तर महाबळेश्वरमध्ये २८६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले असून नुकसानग्रस्त भागात मदत व पंचनाम्याचे काम सुरू आहे.


