
हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात; न्यायासाठी ग्रामस्थांचे उपोषण
कराड : कोयना वसाहत ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक शिवकालीन पाणंद रस्त्यावर झालेल्या कथित अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या प्रकरणी ग्रामस्थांच्या वतीने संजय चव्हाण यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत येथील उत्तर-दक्षिण जखिणवाडी रोड, घुणकी, मातोश्री पतसंस्था, डी-मार्ट ते म्हसोबा चौक असा जाणारा शिवकालीन पाणंद रस्ता ग्रामपंचायतीच्या अभिलेखातील नमुना क्रमांक २३ मध्ये नोंद आहे. हा रस्ता सुमारे १७१० फूट लांब आणि ३३ फूट रुंद असून परिसरातील शेकडो नागरिक या मार्गाचा दररोज वापर करतात.
मात्र, रस्त्यालगतच्या काही हिस्सेदारांनी सुमारे ४०० मीटर लांबीपर्यंत आणि १३ फूट रुंदीपर्यंत अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे रस्त्याची मूळ रुंदी कमी झाली असून नागरिकांना वाहतूक आणि दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने ग्रामस्थांनी कराड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शिवकालीन पाणंद रस्ता तात्काळ अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी खुला करावा तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, या आंदोलनाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून प्रशासनाकडून आता कोणती भूमिका घेतली जाते आणि ग्रामस्थांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.


