रहिमतपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा रोखला बालविवाह

रहिमतपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा रोखला बालविवाह

कोरेगाव : रहिमतपूर पोलिस आणि बाल संरक्षण यंत्रणेच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाबाहेरील मंदिरात हा विवाह होणार होता. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत विवाह थांबवला आणि अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करून तिला कायद्याचे संरक्षण मिळवून दिले.

रहिमतपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना २६ जून रोजी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ विवाहस्थळी धाड टाकली. त्यावेळी विवाहाची तयारी सुरू असून सुमारे २५ ते ३० नातेवाईक उपस्थित असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी विवाह सोहळा तातडीने थांबवून नवरी मुलीच्या वयाची अधिकृत कागदपत्रे तपासली. पडताळणीत मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत कोरेगाव येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव व ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

महिला पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला विश्वासात घेत तिच्या नातेवाईकांसह रहिमतपूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर महिला व बालविकास विभागाने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित बालिकेला सातारा जिल्हा बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण बर्गे, शंकर घाडगे, महेश शेडगे, सुशांत शिंदे, महिला पोलीस हवालदार शितल सानप, पोलीस कॉन्स्टेबल समाधान देशमुख, संजय सपकाळ, तुषार काळंगे, अश्विनी घाडगे, शुभांगी पाटोळे, अर्पिता गायकवाड तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांच्या सहभागातून पार पडली.

बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यात रहिमतपूर पोलिसांना यश आले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )
error: Content is protected !!